रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेबाबत धक्कादायक खुलासा

0

◼️ ठेकेदाराने बनावट कागदपत्रे सादर करून मक्ता मिळवल्याचा आरोप

◼️ ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यासह ११ जणांविरोधात कोर्टात धाव

रत्नागिरी : सुरुवातीपासून वाजत गाजत असणारी रत्नागिरी शहराची नळपाणी योजना आता जवळ जवळ पूर्ण होत आली असताना एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे मिलिंद कीर आणि निलेश भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत या नळपाणी योजनेबाबत काही धक्कादायक कागदपत्र समोर आणली आहेत. नळपाणी योजनेचा ठेका मिळवण्यासाठी ठेकेदार अन्वी कन्स्ट्रक्शन यांनी कोल्हापूर, सांगली आदी भागातील शासकीय कार्यालयातून खोटी कागदपत्रे बनवून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे हा ठेका मिळवल्याचा आरोप महेश ज्ञानदेव थिटे, सोलापूर यांनी केला असून याबाबत दाद मागण्यासाठी थिटे यांनी रत्नागिरी कोर्टात धाव घेतल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली आहे.

महेश ज्ञानदेव थिटे यांनी याबाबत २० फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी न्यायालयात आपली फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी ठेकेदार, तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद माळी, सध्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांचेसह ११ जणांना प्रतिपक्ष बनवले आहे. कोर्टात सदर करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये थिटे यांनी म्हटले आहे कि ठेकेदाराने सबंधित नळपाणी योजनेचा मक्ता मिळवताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे बनवून सदरचा मक्ता घेतला आहे. ठेकेदार प्रथम क्लास ४ मध्ये होता मात्र ठेका घेण्याआगोदर ३१ दिवसांपूर्वीच त्याने १ चे रजिस्ट्रेशन केले आहे.हे रजिस्ट्रेशन करताना सादर करण्यात आलेली कागदपत्रे देखील बोगस आहेत. नळपाणी योजनेची निविदा मिळवण्यासाठी बनावट वर्कडन सर्टीफिकेट जोडण्यात आली असून या कृत्याला सर्वच अधिकाऱ्यांनी देखील सहाय्य केले आहे. याबाबतची तक्रार रत्नागिरी जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करून देखील त्यांनी दखल घेतली नाही असा आरोप थिटे यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या नळपाणी योजनेत खूप मोठा भ्रष्ठाचार केल्याचा आरोप देखील या खासगी फिर्यादी मध्ये करण्यात आला आहे.

माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या या कागदपत्रांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आजवर नळपाणी योजनेच्या निकृष्ठ कामाबाबत अनेकवेळा जनतेतून बोलले जात होते. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याने यामधील नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यास मोठी मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 03-10-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here